डॉ . सुनील शिंदे : अगस्त्य फीचर्स , अकोले राजकारण राजकारणाच्या पद्धतीने काळाच्या ओघात पुढे सरकत असते . परिस्थितीची स्थित्यंतरे कधीकधी आश्चर्यकारक रीतिने रंग बदलताना दिसतात . समाजकारण , जनमानस स्थितीगतीला वळण देते . काही माणसं राजकीय पटलावर स्वतःच्या वेगळेपणाने ओळख निर्माण करतात तर काही वादग्रस्त ठरतात . काही धीरगंभीर तर काही उथळ , सपक , सर्वसाधारण . काही तडाखेबाज , धडाकेबाज तर काही काळाचे अपत्य म्हणून गुळगुळीत - मिळमिळीत !
2024 विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी करीत असलेले माजी आमदार वैभवराव पिचड हे महाविद्यालयीन जीवनात शिकत असल्यापासूनच वाद , अशांतपणा , तंटेबखेडे , विद्वेष यांपासून अलिप्त असलेले नेमस्त व्यक्तित्व ! शांत , संयमी , मानमरातब राखणारे अन् दुसऱ्याला respect देण्यात माहीर . आदरणीय पिचड साहेब सत्तेत असताना अगस्ती महाविद्यालयात वैभव पिचड विज्ञान शाखेत विद्यार्थी म्हणून शिकत होते . आदरणीय पिचड साहेबांच्या मंत्री पदाचा अथवा सत्तेचा कोणताही आविर्भाव , मोठेपणा वैभवभाऊंच्या वर्तनात तेंव्हा तसूभरही डोकावत नव्हता हे त्यांचे वेगळेपण लक्षणीय ठरले .
मला आठवतंय , के . बी . दादा सभागृहाशेजारील वर्गात तास घ्यायला जिन्यातून जाताना आणि पायऱ्या उतरताना हमखास जातायेता वैभवभाऊ अत्यंत अदबीने विद्यार्थ्यांच्या गर्दीतूनही लगबगीने बाजूला होत वाट करुन देत .. सर्वच शिक्षकांच्या बाबतीत त्यांचे वर्तन त्यावेळी कमालीचे विनयशील अन् आदबशीर राहिले ! एरवी काही विद्यार्थ्यांत असणारी - दिसणारी गुर्मी - उर्मटपणा कधीही केंव्हाही त्यांच्यात मुळीच जाणवला नाही .
घरातील संस्कारांचा परिणाम असतोच पण स्वतःचा कमावलेला वागण्याबोलण्यातला संस्कारांचा भाग असतो , तो वर्तनात असावा लागतो .. तसा तो कायमच वैभवभाऊंच्या स्वभावात जाणवला .
विषय राजकीय - सार्वजनिक जीवनातील संदर्भात येतो तेंव्हा तुलना आणि चिकित्सा जेंव्हा होते त्यावेळी वैयक्तिक पैलूंचा परामर्श घेतला जातो . असो .
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पडघम वाजताहेत . केंद्रात ज्यावेळी घडामोडी घडतात तेंव्हा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतातच असे नाही आणि महाराष्ट्रात जेंव्हा निवडणूकीचे जे काही चित्र असते त्यावेळी अकोले मतदार संघात असणारे पडसाद हे विलक्षण स्वरूपात निराळेच असू शकतात !
अकोले मतदार संघ कायमच परिवर्तनशील अन् क्रांतीकारी राहिला आहे . इथे पूर्वापार मूलतत्त्ववादी - प्रतिगामी शक्तींना अजिबात थारा कधीही राहिला नाही ! याचे कारण , सातत्याने समाजवादी तसेच कम्युनिस्ट चळवळीचे अधिष्ठान अन् वारे इथल्या मातीत रुजले , वाहिले , टिकून राहिले ! तालुक्याचा कल अन् मोहर कसा उमटेल हे अखेरच्या टप्प्यातही भल्याभल्यांना चकवून जातो हेच ते खणखणीत सत्य ..
आत्ताची निवडणूक बहुरंगी , बहुढंगी तसेच अंतरंग उमगू न देणारी ! उमेदवारांच्या बहुप्रतिसादी एन्ट्रीने उत्कंठा धूसर असलीतरी पारंपरिक मतदान कसे वळण घेईल अन् कलाटणी देईल ते अखेरपर्यंत गुलदस्त्यात असेल ! भूतपूर्व आमदार यशवंतराव भांगरे , कॉम्रेड बी . के . देशमुख आणि मधुकरराव पिचड यांच्या लक्षवेधी आणि दखलपात्र कारकिर्दीचा लेखाजोखा ऐतिहासिक पैलूंना उजाळा देणारा आहे .. माजीमंत्री लोकनेते मधुकरराव पिचड सध्या आजारपणाने रुग्णालयात दाखल आहेत . तालुक्यातून त्यांच्या स्वास्थ्यासाठी सद्भावना आहेत . कार्यकर्ते आणि लोकाग्रहास्तव वैभवराव पिचड निवडणूकीत उतरले आहेत .
व्यक्तिशः वैभव पिचडांच्या मागे एकूणच स्थितीगतीचा सामर्थ्यवान स्रोत सद्यस्थितीत सकारात्मक वळणावर आहे .
----------------------------------------------
डॉ . सुनील शिंदे
' अगस्त्य फीचर्स '
अकोले / अहमदनगर